प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो.. ती गोष्ट त्याच्या आवाक्याबाहेरची असली तरी त्याला त्या गोष्टीबद्दल आकर्षण असतचं.. अशाच काही १० गोष्टी माझ्या आयुष्यातल्या...माझ्या स्वप्नातल्या...ज्या मला पूर्ण करायच्या आहेत..
लवकर लग्न होऊन संसारात मग्न झालेल्या माझ्या आईला जास्त कुठे फिरताच आले नाही. मी मोठी होत असतांना माझा सांभाळ, माझा अभ्यास, माझे छंद जोपासण्यात तिचा वेळ गेला. म्हणून तिला बाहेरच्या जगाची पुरेशी ओळख नाही. यासाठीच मला एकदा तरी आईला सोबत घेऊन पूर्ण मुंबई फिरायची आहे..मुंबई कशी आहे, मुंबई कशी पडायला आणि सावरायला शिकवते हे दाखवायचे आहे.
पहिल्यापासून दूरदर्शन वर अनेक कार्यक्रमांत मोठी-मोठी घरं पाहिली होती, त्या घराबाहेर असणारा झोपाळा, मस्त झाडे, घरात गेल्यांनंतर असणारा गालिचा, झुंबर, भिंतींवर असणारे नक्षीकाम या सर्वांनी माझं लक्ष वेधून घेतलं होत. तेव्हा पासून मनात इच्छा आहे की छोटसं का होइना पण स्वत:च घर घ्यावं, त्या घराला माझ्या मनाप्रमाणे सजवावं, गच्चीमध्ये उभे राहून हातांवर त्या पाऊसधारा घ्याव्यात आणि विचारांत गुंतून जावे.
अभिनेत्री मृणाल दुसानीस अनेक कार्यक्रमांद्वारे प्रेषकांपर्यंत पोहचली. तीच सुंदर दिसणं, लाजणं, मनमोकळेपणे हसणं, या सर्वच गोष्टी मला खूप आवडतात. एखाद्या मुलाखतीमध्ये ती जेव्हा बोलते तेव्हा तिच्यात मला मीच दिसते. तिचे आणि माझे विचार बऱ्याचदा मला सारखेच वाटतात. म्हणून एकदा तरी मला तिच्याशी भेटून संवाद साधायचा आहे.
कोणत्याही व्यक्तीला काही ही वाईट बोलून रडवणे तसे सोप्पेच असते. परंतु, एखाद्या व्यक्तीला हसवणे हे मात्र कठीणच काम आहे. दुसऱ्याला हसवण्यासाठी मुळात ती व्यक्ती सिरीयस असावी लागते तर असे हसवण्याचे काम करणारे अभिनेता हास्यसम्राट भालचंद्र कदम यांना मला भेटायचं आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून हसायचं आहे.
मला लिहिण्याची आणि कविता करण्याची आवड आहे. मी जे वाटेल, ते मनात येईल ते मी लिहीत असते. त्यासाठीच मला स्वत: च एखाद तरी पुस्तक लिहायचे आहे. मग ते कोणत्याही विषयावर असो किंवा कवितेवर असो. ते पुस्तक लिहून प्रकाशित करायचे आहे.
मला गाण्याची ही खूप आवड आहे. मी अनेकदा गुणगुणत असते. माझ्या आवडीची अनेक गाणी मला तोंडपाठ आहेत. एखाद्या कार्यक्रमात मला स्टेजवर गाणे सादर करायचे आहे.
मी इतकी फूडी नाही. जे पदार्थ आवडतात त्यांचाच आस्वाद घेत असते. त्यामुळे काही स्वादिष्ट पदार्थांची चव घेणे माझ्याकडून राहून गेलं आहे. म्हणूनच मला खाण्याचे वेगवेगळे पदार्थ टेस्ट करून पाहायचे आहे.
कुटुंबासोबत फिरण्यात एक वेगळी मज्जा असते. जर तो फिरण्याचा आनंद विमानात बसून घेता आला तर किती मज्जा येईल! म्हणूनच मला विमानात बसून माझ्या कुटूंबासोबत विदेशात जायचे आहे..बाहेरचा देश, तेथील संस्कृती, तेथील निसर्ग पाहायचा आहे.
फोटोग्राफी चे संपूर्ण तंत्र शिकून छान फोटोज काढायचे आहेत. मी निसर्गप्रेमी असल्यामुळे निसर्गाच्या सुंदर देखाव्यासोबत मला छायाचित्रण करायचे आहे. देखाव्याचे क्षण टिपायचे आहेत.
मला नृत्याची देखील आवड आहे. आतापर्यंत मी राजस्थानी, ओडिसी, आसामी, उत्तरांचल येथील संस्कृतींवर आधारलेल्या गाण्यांवर नृत्य केला आहे. आता मला प्रत्येक संस्कृतीची, भाषा शिकून त्यांच्या लोकसंगीतावर नृत्य करायचा आहे.
No comments:
Post a Comment